स्वानंद

मराठीतून लिहीण्याचा स्वर्गीय आनंद घेताना...

Tuesday, February 21, 2006

सुंदर जीवन

एक अर्थपूर्ण जीवन जगायचं, आयुष्याचं चीज करायचं हे नेहमीच वाटत आलं मला. पण एक दिवस तू म्हणालास, "एक सुंदर आयुष्य जगायचं, त्या सौंदर्याची व्याख्या आपणच करायची आणि अनुकूल, प्रतिकूल कशाही परिस्थितीत ते टिकून ठेवायचंही आपणच". आणि अचानक मला माझ्या आयुष्याचा अर्थ गवसल्यागत झालं.

Tuesday, February 14, 2006

कोणाच्या आयुष्यातील आचार-विचार, आनंद-दु:ख आपल्यावर अवलंबून आहेत या जाणीवेइतकं दुसरं मोठं ओझं कोणतं? अर्थात ही तुम्ही स्वत:हून करून घेतलेली समजूत असेल तर गोष्टं वेगळी. पण त्याव्यक्तीने सहवासातल्या प्रत्येकक्षणी जर तीच जाणीव करून दिली तर किती तिटकारा येत असेल?
अशा व्यक्तीसोबत रहाताना तिला तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून देणं किती महत्वाचं आहे हे सगळं भोगणाऱ्यापेक्षा कोणाला जास्त तीव्रतेने कळेल? सतत सतत प्रयत्न करूनही तिचा स्वाभिमान बाहेर येत नाही यातली निराशाही खूपच असणार. पण हे सगळं झेलत असताना आणि परिस्थिती सुधारायचा आटोकाट प्रयत्न करत असताना स्वत:च्या आयुष्यातच जर अस्थिरता निर्माण होत असेल ; आपण पोखरल्या जातो आहे याची जाणीव मनात डोकावत असेल आणि आयुष्याच्या आधारस्तंभांवरही आक्रमण होतंय, तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात आवडीच्या आणि जपलेल्या गोष्टी हिरावून घेण्याचा नकळत प्रयत्न होतो आहे असं वाटायला लागलं आणि या सगळ्या भावनांपेक्षाही जर तुमच्या आयुष्यात अवास्तव हस्तक्षेप होत असेल तर पायात रूतणाऱ्या काट्याला काढून फेकाल तसंच जर तुम्ही ते नातंही आयुष्यातून काढून टाकलं तर चुकलं कुठे? ( हा रूपक, उपमा किंवा अशाच कुठल्यातरी अर्थालंकाराचा प्रयोग चुकीचा आहे. कारण नाती म्हणजे काटे नव्हेत. बिघडलेली नाती सलणाऱ्या काट्यांपेक्षाही जास्त बोचतात, घायाळ करतात आणि तरीही ती इतकी सहज आयुष्यातून काढून नाही टाकता येत, वर्षानुवर्षे सलतच राहतात.) आणि याहीनंतर जर "तू माझं स्वतंत्र अस्तित्व कधीच लक्षात घेतलं नाहीस" अशी वाक्यं ऐकायला मिळाली तर नि:स्वार्थीपणे दाखवलेल्या चांगुलपणावर विश्वास राहील कोणाचा?

Tuesday, February 07, 2006

B.M.T.C.

कार्यालयाची जागा बदलल्याने आणि नवीन कंपनीच्या कॄपेने अशातच "बॅन्गलोर म्युनिसिपल कॉर्पोरेशन" च्या बसेसनी जवळपास पंधरा दिवस येणंजाणं करण्यात आलं.
सामान्यातिसामान्य नागरिकासाठी अतिशय सोईस्कर अशी व्यवस्था आहे ही. दक्षिण भारतातल्या इतर गोष्टींप्रमाणे इथल्या बसेसची पण काही वैशिष्ट्ये आहेत ( उर्वरीत भारतापेक्षा वेगळी हे सांगायला नको. :) ). नानाप्रकारच्या बसेस असतात इथे...सगळ्याच आपल्या लालपिवळ्यांसारख्या एकाच रंगसंगतीत रंगवलेल्या नसतात. विटकरी आणि पांढऱ्या ( यांना म्हणायचं "पुष्पक" बसेस ), निळ्या आणि पांढऱ्या, "जंटीवाहन" नावाच्या एका विशिष्ट यंत्रणेने जोडलेल्या मोठ्ठ्या बसेस इत्यादी. या सगळ्यांमधे एक गोष्ट मात्र खूपच मनापासून पाळली जाते; ती म्हणजे स्त्रियांनी पुढील अर्ध्या भागात बसणे वा उभे रहाणे. काही आसनरांगांवर "महीलांसाठी राखीव" असं लिहिलेलं असतं ( अर्थात ते कन्नडामध्ये असतं, पण त्याबरोबरच अगदी एकसारख्या स्त्रीप्रतिमा काढलेल्या असतात खिडक्यांवर ) आणि इथले लोक खरंच ते पाळतात, नसता १०० रू. दंड आहे.
बसमध्ये कधी वाहकच नसेल आणि वाहनचालकच तिकिट देत असेल तर घाबरून नका हं जाऊ, इथे हे अगदी नॉर्मल आहे. खूपदा महीला वाहक पाहून अभिमानही वाटेल.
भारतात कुठेही पाहायला मिळेल अशी गर्दी इथेही असते आणि अर्थात गर्दी म्हटली की धक्काबुक्की, शिव्यागाळ ओघाने आलीच. पण कोणी शिव्यागाळ केली तरीसुद्धा तुम्ही हसतमुख राहू शकता.( कारण शिव्या समजायला हव्यात ना... :) )
या बस प्रकरणावरून मला माझा बी. एम. टी. सी चा पहिलावहिला प्रवास आठवला. बॅन्गलोरला येऊन जेमतेम १५ दिवस झाले होते. कुठेतरी बाहेर निघाले आणि चढले लोकल बसमध्ये. ( अर्थातच ती योग्य जागी नेऊन पोहोचवेल याची खात्री केल्यावर) महीला वाहक होती बसमध्ये. ती माझ्याकडे पाहून बडबडली "येल्ली", मला वाटलं मला तिकिट विचारत आहे. मी कसंबसं तिला हिंदी, इंग्लिश मधून सांगितलं की "थांब काढतीय". पण ती परत तेच म्हणाली. मला काही सुचेना, मी तिला परत तेच सांगितलं कारण गर्दी होती आणि मला पैसे काढायला वेळ लागत होता. तिचं डोकं सटकलं असावं बहुतेक. परत ती तेच म्हणाली पण एकदम चढ्या आवाजात. मला मग अचानक बुद्धी कुठून सुचली कोणास ठाऊक. मीही उत्तर दिले "मॅजेस्टिक" (मला इथे जायचं होतं). तेंव्हा कुठे तिचं समाधान झालेलं दिसलं. तिने मग लगेच तिकिट ठेवलं माझ्या हातात. नंतर "येल्ली" म्हणजे "कुठे" हे समजल्यावर मला माझंच खूप हसू आलं.
नानाप्रकारचे लोक बघायला मिळतात त्या १ तासाच्या प्रवासात. काळ्या दगडातल्या रेखीव मुर्त्यांना गजरा वगैरे लावून सजवलं तर दिसतील तशा कितीतरी बायका, सतत मारक्या म्हशीसारख्या पाहणाऱ्या काकू, या गर्दीत उभा राहाणं म्हणजे जगातली सगळ्यात दु:खद गोष्ट आहे असे भाव चेहऱ्यावर असणारे लोक आणि जसंकाही बस म्हणजे शाळाकॉलेजचा कट्टा आहे अशा समजुतीत आपल्याच धुंदीत गप्पा मारणारी लहान मुलं आणि युवा मंडळी. आज नवऱ्याला किती वाजता उठवलं आणि स्वयंपाकात काय बनवलं याही गप्पा कानावर पडतीलच.
"मुंदे होगी, मुंदे होगी" ( पुढे व्हा ) अशा घोषणा करत पुढे येणाऱ्या वाहकाचा डोळा चुकवून आहोत त्या जागी खांबाला धरून आरामात उभा रहाण्यात किंवा तिथेच बसलेल्या आणि लवकरच उतरणार आहे हे माहीत असलेल्या (ते माहीत करायला पण काय काय क्ल्रुप्त्या कराव्या लागतात माहीत आहे का. उदाहरणार्थ, त्या व्यक्तीच्या हातातल्या तिकिटावरचं भाडं पाहून अंदाज घेणं) व्यक्तीच्या उतरण्याची वाट पहात तिथेच अडून उभा रहाण्यात उगीचच एक आनंद मिळतो. ( असूरी आनंद कदाचित )
महीलांसाठी राखीव असं लिहीलेल्या जागेवर बसलेली टारगट पोरं जेंव्हा उठून आपल्याला जागा देतात ( स्त्रीदाक्षिण्य म्हणून नव्हे तर दंड लागू नये म्हणुन ) तेंव्हा उगीचच स्त्रीत्वाची जाणीव होऊन आनंद होतो. ( हाही तसा असूरी आनंदच )
ह्या आणि आणखी कितीतरी आठवणींनी भरलेल्या माझ्या कार्यालयाच्या वाऱ्यांऐवजी आजकाल एक वेगळचं वारं आहे माझ्या प्रवासांत. मी दुचाकी घेतली आहे नवीन...तिच्याबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन.