स्वानंद

मराठीतून लिहीण्याचा स्वर्गीय आनंद घेताना...

Friday, March 10, 2006

संगीत आणि मी

संगीत आणि त्यातलं माधुर्य मला लहानपणी का कधी जाणवलं नाही याविषयी मला खूप खंत वाटते कधी कधी. संगीताच्या मॅडम खूप मागे लागल्या तेंव्हा मी शास्त्रीय संगीताची एक परिक्षा दिली, पण मला आठवतं मी खूप कुणकुण करायचे ते आरोह-अवरोह, राग आणि त्यांच्या चीज, ताल वगैरे पाठ करायला. खूप जीवावर यायचं माझ्या. पण आज खरंच खेद आहे माझ्या त्या आळशीपणाचा. आज एखादं सुंदर गाणं, एखादा सुंदर आवाज ऐकून जेंव्हा मंत्रमुग्ध व्हायला होतं तेंव्हा असं वाटतं की किती मुर्ख होतो आपण. आणि मागच्या शनिवारी तर मला हे खूप प्रकर्षाने जाणवलं.
मी एका मैत्रीणीकडे राहायला गेले होते शनिवारी, एक मस्त पिक्चर बघायचा बेत होता, पण आमच्या नशीबात तो नव्हता. (तिच्या घरी पिक्चर बघायच्या या आधीच्या सगळ्या प्रयत्नांचा विद्युतप्रवाह खंडित झाल्याने चांगलाच पचका झालेला असूनही आम्ही आशा सोडली नव्हती).
पण या वेळी पचक्याचं कारण वेगळं होतं, डी.व्ही.डी प्लेयरच्या रिमोटची बॅटरी डाउन होती. :(
मग कोणत्या प्रकारे करमणुक करावी या विषयावर चर्चा चालली असताना तिने एक एकदम मस्त गोष्ट दाखवली मला. तिची लहानपणाची संगीताची वही. २००पानी वहीत तिच्याकडे कितीतरी गाणी लिहिलेली होती. आणि जन्माने कन्नडा असली तरी माझी मैत्रीण मुंबईची आहे, अगदी अस्सल महाराष्ट्रीयन वातावरणात वाढलेली, त्यामुळे जवळपास सगळी गाणी मराठी होती.
तिने वही उघडायचा अवकाश की आमची स्वरेन्द्रियं खडखडायला लागली.

"उष:काल होता होता, काळरात्र झाली; अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली..."
"गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा..."
"आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे; तोषोनी मज द्यावे पसायदान हे..."
"खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे..."
"इतनी शक्ती हमे दे ना दाता, मनका विश्वास कमजोर हो ना..."
"फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेंदीने शकुनाच्या मेंदीने..."
"सत्यम शिवम सुंदरा, ज्ञान मंदिरा..."
"सारे जहां से अच्छा, हिन्दोसता हमारा..."
"जयोस्तुते, जयोस्तुते, श्री महन्मगले शिवस्पदे शुभदे..."
"वंदे मातरम, सुजलाम, सुफलाम, सुमधुर शितलाम, सस्यशामलाम मातरम..."
"मेंदीच्या पानावर मन अजून झुलतंय गं..."
"पाउस पहीला जणू कानुला, बरसून गेला बरसून गेला..."
"आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई; जात वेगळा नाही आम्हा धर्म वेगळा नाही..."
"शारदे उदयोस्तुते, शारदे उदयोस्तुते; तुज सर्वदे करी वंदना..."
"येरे घना येरे घना, नाहू घाल माझ्या मना..."
"रानातल्या राघु माझ्या अंगणात येना, गोड तुझे गाणे जरा ऐकु दे साऱ्यांना..."
"मला न कळले सारेगम गाण्याचे संगीत..."
"मोगरा फुलला, मोगरा फ़ुलला, फुले वेचिता बहरू कळियासि आला..."
"जय शारदे वाघेश्वरी, जय शारदे वाघेश्वरी..."
"आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा..."
"हमको मन की शक्ती दे, मन विजय करे; दुसरों की जय से पहेले खूद को जय करें..."
अगदी "सुरासुर भजत मुनीवर शंकर..." ही भूपची चीज सुद्धा. :)

अशी कितीतरी वेळ आम्ही न थांबता गाणी गात होतो.
आणि मी शब्दात नाही सांगू शकत मला किती मज्जा आली.
खरच संगीतासारखी दुसरी शक्ती नाही असं वाटायला लागतं कधी कधी.
पावसात खिडकीत बसून पावसाची गाणी म्हणायची झाडं, स्वच्छंद पक्षी बघत, वीज गेली घरातली की गाणाच्या भेंड्या खेळायच्या घरात आणि मग भेंड्या खेळता खेळता एकदम ताळमेळ सोडून सगळी आवडीची गाणी म्हणायला लागायचं प्रत्येकाने,
प्रत्येक प्रसंगाला अनुरुप गाणं म्हणायचं, जसं शाळॆच्या समारोपाला "अखेरचा हा तुला दंडवत..." अशा कितीतरी संगीतमय क्षणांनी मला नेहमीच प्रभावीत केलं आहे.
शास्त्रीय संगीत शिकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन परत...कधी ते माहीत नाही.