स्वानंद

मराठीतून लिहीण्याचा स्वर्गीय आनंद घेताना...

Friday, November 17, 2006

रुग्णवाहिका आणि रहदारी

सकाळची वेळ.
बेंगलोर शहरातला एक गजबजलेला रस्ता, छोटासा, डिवायडर नसलेला पण दुपदरी.
दोन्ही बाजूने गाड्यांची जीवघेणी कसरत चाललेली, रहदारीतून वाट काढण्याची.
प्रत्येकालाच ऑफ़िसला पोहोचायची घाई झालेली आणि प्रत्येकाच्या मनातही कदाचित तेच विचार.
अशात एक अगदी ओळखीचा आवाज हळू हळू मोठा होत होत आपल्या कानावर पडतो.
आपण आवाजाच्या दिशेने पाहतो आणि मनात धस्स होते, इतक्या ट्राफ़िक मधून ही रुग्णवाहिका कशी वाट काढणार हा विचार करुन खूप वाइट वाटते.
माझा जीव खालीवर होत असतो आणि अशा वेळेला आपण काहीच करु नाही शकत तिला वाट करुन देण्यासाठी ही खंत जाणवते मनात.
आणि मी परत तिच्या दिशेने पाहते तर काय रुग्णवाहिकेचा ड्रायवर त्याचे सगळे स्किल्स पणाला लावून पुढे जायचा प्रयत्न करत आहे, आणि दुसऱ्या दिशेने येणारी एक कार त्याच्या रस्त्यात आली आहे, त्या कारच्या ड्रायवरने पण रुग्णवाहिकेला न जुमानता पुढे जायची मरमर केलेली दिसते.
क्षणात एकदम जगातल्या माणुसकीचा ह्रास झाला की काय असं वाटायला लागतं.
आपण आपल्या स्वत:च्या प्रायॉरिटिजना इतकं अवास्तव महत्व देऊन जगतो की समोर एक माणुस कदाचित त्याच्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत आहे, त्याला तत्पर मदतीची गरज आहे हे कसं विसरल्या जाऊ शकतं? कोणाकडूनही...
आणि आयुष्यात सगळ्यात मोठी गम्मत ही आहे की आज त्या माणसाबद्दल काडीचीही सहानुभुति न दाखवणारे तुम्ही पुढच्याच क्षणी त्याच्या अवस्थेत असू शकता...

Friday, March 10, 2006

संगीत आणि मी

संगीत आणि त्यातलं माधुर्य मला लहानपणी का कधी जाणवलं नाही याविषयी मला खूप खंत वाटते कधी कधी. संगीताच्या मॅडम खूप मागे लागल्या तेंव्हा मी शास्त्रीय संगीताची एक परिक्षा दिली, पण मला आठवतं मी खूप कुणकुण करायचे ते आरोह-अवरोह, राग आणि त्यांच्या चीज, ताल वगैरे पाठ करायला. खूप जीवावर यायचं माझ्या. पण आज खरंच खेद आहे माझ्या त्या आळशीपणाचा. आज एखादं सुंदर गाणं, एखादा सुंदर आवाज ऐकून जेंव्हा मंत्रमुग्ध व्हायला होतं तेंव्हा असं वाटतं की किती मुर्ख होतो आपण. आणि मागच्या शनिवारी तर मला हे खूप प्रकर्षाने जाणवलं.
मी एका मैत्रीणीकडे राहायला गेले होते शनिवारी, एक मस्त पिक्चर बघायचा बेत होता, पण आमच्या नशीबात तो नव्हता. (तिच्या घरी पिक्चर बघायच्या या आधीच्या सगळ्या प्रयत्नांचा विद्युतप्रवाह खंडित झाल्याने चांगलाच पचका झालेला असूनही आम्ही आशा सोडली नव्हती).
पण या वेळी पचक्याचं कारण वेगळं होतं, डी.व्ही.डी प्लेयरच्या रिमोटची बॅटरी डाउन होती. :(
मग कोणत्या प्रकारे करमणुक करावी या विषयावर चर्चा चालली असताना तिने एक एकदम मस्त गोष्ट दाखवली मला. तिची लहानपणाची संगीताची वही. २००पानी वहीत तिच्याकडे कितीतरी गाणी लिहिलेली होती. आणि जन्माने कन्नडा असली तरी माझी मैत्रीण मुंबईची आहे, अगदी अस्सल महाराष्ट्रीयन वातावरणात वाढलेली, त्यामुळे जवळपास सगळी गाणी मराठी होती.
तिने वही उघडायचा अवकाश की आमची स्वरेन्द्रियं खडखडायला लागली.

"उष:काल होता होता, काळरात्र झाली; अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली..."
"गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा..."
"आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे; तोषोनी मज द्यावे पसायदान हे..."
"खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे..."
"इतनी शक्ती हमे दे ना दाता, मनका विश्वास कमजोर हो ना..."
"फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेंदीने शकुनाच्या मेंदीने..."
"सत्यम शिवम सुंदरा, ज्ञान मंदिरा..."
"सारे जहां से अच्छा, हिन्दोसता हमारा..."
"जयोस्तुते, जयोस्तुते, श्री महन्मगले शिवस्पदे शुभदे..."
"वंदे मातरम, सुजलाम, सुफलाम, सुमधुर शितलाम, सस्यशामलाम मातरम..."
"मेंदीच्या पानावर मन अजून झुलतंय गं..."
"पाउस पहीला जणू कानुला, बरसून गेला बरसून गेला..."
"आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई; जात वेगळा नाही आम्हा धर्म वेगळा नाही..."
"शारदे उदयोस्तुते, शारदे उदयोस्तुते; तुज सर्वदे करी वंदना..."
"येरे घना येरे घना, नाहू घाल माझ्या मना..."
"रानातल्या राघु माझ्या अंगणात येना, गोड तुझे गाणे जरा ऐकु दे साऱ्यांना..."
"मला न कळले सारेगम गाण्याचे संगीत..."
"मोगरा फुलला, मोगरा फ़ुलला, फुले वेचिता बहरू कळियासि आला..."
"जय शारदे वाघेश्वरी, जय शारदे वाघेश्वरी..."
"आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा..."
"हमको मन की शक्ती दे, मन विजय करे; दुसरों की जय से पहेले खूद को जय करें..."
अगदी "सुरासुर भजत मुनीवर शंकर..." ही भूपची चीज सुद्धा. :)

अशी कितीतरी वेळ आम्ही न थांबता गाणी गात होतो.
आणि मी शब्दात नाही सांगू शकत मला किती मज्जा आली.
खरच संगीतासारखी दुसरी शक्ती नाही असं वाटायला लागतं कधी कधी.
पावसात खिडकीत बसून पावसाची गाणी म्हणायची झाडं, स्वच्छंद पक्षी बघत, वीज गेली घरातली की गाणाच्या भेंड्या खेळायच्या घरात आणि मग भेंड्या खेळता खेळता एकदम ताळमेळ सोडून सगळी आवडीची गाणी म्हणायला लागायचं प्रत्येकाने,
प्रत्येक प्रसंगाला अनुरुप गाणं म्हणायचं, जसं शाळॆच्या समारोपाला "अखेरचा हा तुला दंडवत..." अशा कितीतरी संगीतमय क्षणांनी मला नेहमीच प्रभावीत केलं आहे.
शास्त्रीय संगीत शिकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन परत...कधी ते माहीत नाही.

Tuesday, February 21, 2006

सुंदर जीवन

एक अर्थपूर्ण जीवन जगायचं, आयुष्याचं चीज करायचं हे नेहमीच वाटत आलं मला. पण एक दिवस तू म्हणालास, "एक सुंदर आयुष्य जगायचं, त्या सौंदर्याची व्याख्या आपणच करायची आणि अनुकूल, प्रतिकूल कशाही परिस्थितीत ते टिकून ठेवायचंही आपणच". आणि अचानक मला माझ्या आयुष्याचा अर्थ गवसल्यागत झालं.

Tuesday, February 14, 2006

कोणाच्या आयुष्यातील आचार-विचार, आनंद-दु:ख आपल्यावर अवलंबून आहेत या जाणीवेइतकं दुसरं मोठं ओझं कोणतं? अर्थात ही तुम्ही स्वत:हून करून घेतलेली समजूत असेल तर गोष्टं वेगळी. पण त्याव्यक्तीने सहवासातल्या प्रत्येकक्षणी जर तीच जाणीव करून दिली तर किती तिटकारा येत असेल?
अशा व्यक्तीसोबत रहाताना तिला तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून देणं किती महत्वाचं आहे हे सगळं भोगणाऱ्यापेक्षा कोणाला जास्त तीव्रतेने कळेल? सतत सतत प्रयत्न करूनही तिचा स्वाभिमान बाहेर येत नाही यातली निराशाही खूपच असणार. पण हे सगळं झेलत असताना आणि परिस्थिती सुधारायचा आटोकाट प्रयत्न करत असताना स्वत:च्या आयुष्यातच जर अस्थिरता निर्माण होत असेल ; आपण पोखरल्या जातो आहे याची जाणीव मनात डोकावत असेल आणि आयुष्याच्या आधारस्तंभांवरही आक्रमण होतंय, तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात आवडीच्या आणि जपलेल्या गोष्टी हिरावून घेण्याचा नकळत प्रयत्न होतो आहे असं वाटायला लागलं आणि या सगळ्या भावनांपेक्षाही जर तुमच्या आयुष्यात अवास्तव हस्तक्षेप होत असेल तर पायात रूतणाऱ्या काट्याला काढून फेकाल तसंच जर तुम्ही ते नातंही आयुष्यातून काढून टाकलं तर चुकलं कुठे? ( हा रूपक, उपमा किंवा अशाच कुठल्यातरी अर्थालंकाराचा प्रयोग चुकीचा आहे. कारण नाती म्हणजे काटे नव्हेत. बिघडलेली नाती सलणाऱ्या काट्यांपेक्षाही जास्त बोचतात, घायाळ करतात आणि तरीही ती इतकी सहज आयुष्यातून काढून नाही टाकता येत, वर्षानुवर्षे सलतच राहतात.) आणि याहीनंतर जर "तू माझं स्वतंत्र अस्तित्व कधीच लक्षात घेतलं नाहीस" अशी वाक्यं ऐकायला मिळाली तर नि:स्वार्थीपणे दाखवलेल्या चांगुलपणावर विश्वास राहील कोणाचा?

Tuesday, February 07, 2006

B.M.T.C.

कार्यालयाची जागा बदलल्याने आणि नवीन कंपनीच्या कॄपेने अशातच "बॅन्गलोर म्युनिसिपल कॉर्पोरेशन" च्या बसेसनी जवळपास पंधरा दिवस येणंजाणं करण्यात आलं.
सामान्यातिसामान्य नागरिकासाठी अतिशय सोईस्कर अशी व्यवस्था आहे ही. दक्षिण भारतातल्या इतर गोष्टींप्रमाणे इथल्या बसेसची पण काही वैशिष्ट्ये आहेत ( उर्वरीत भारतापेक्षा वेगळी हे सांगायला नको. :) ). नानाप्रकारच्या बसेस असतात इथे...सगळ्याच आपल्या लालपिवळ्यांसारख्या एकाच रंगसंगतीत रंगवलेल्या नसतात. विटकरी आणि पांढऱ्या ( यांना म्हणायचं "पुष्पक" बसेस ), निळ्या आणि पांढऱ्या, "जंटीवाहन" नावाच्या एका विशिष्ट यंत्रणेने जोडलेल्या मोठ्ठ्या बसेस इत्यादी. या सगळ्यांमधे एक गोष्ट मात्र खूपच मनापासून पाळली जाते; ती म्हणजे स्त्रियांनी पुढील अर्ध्या भागात बसणे वा उभे रहाणे. काही आसनरांगांवर "महीलांसाठी राखीव" असं लिहिलेलं असतं ( अर्थात ते कन्नडामध्ये असतं, पण त्याबरोबरच अगदी एकसारख्या स्त्रीप्रतिमा काढलेल्या असतात खिडक्यांवर ) आणि इथले लोक खरंच ते पाळतात, नसता १०० रू. दंड आहे.
बसमध्ये कधी वाहकच नसेल आणि वाहनचालकच तिकिट देत असेल तर घाबरून नका हं जाऊ, इथे हे अगदी नॉर्मल आहे. खूपदा महीला वाहक पाहून अभिमानही वाटेल.
भारतात कुठेही पाहायला मिळेल अशी गर्दी इथेही असते आणि अर्थात गर्दी म्हटली की धक्काबुक्की, शिव्यागाळ ओघाने आलीच. पण कोणी शिव्यागाळ केली तरीसुद्धा तुम्ही हसतमुख राहू शकता.( कारण शिव्या समजायला हव्यात ना... :) )
या बस प्रकरणावरून मला माझा बी. एम. टी. सी चा पहिलावहिला प्रवास आठवला. बॅन्गलोरला येऊन जेमतेम १५ दिवस झाले होते. कुठेतरी बाहेर निघाले आणि चढले लोकल बसमध्ये. ( अर्थातच ती योग्य जागी नेऊन पोहोचवेल याची खात्री केल्यावर) महीला वाहक होती बसमध्ये. ती माझ्याकडे पाहून बडबडली "येल्ली", मला वाटलं मला तिकिट विचारत आहे. मी कसंबसं तिला हिंदी, इंग्लिश मधून सांगितलं की "थांब काढतीय". पण ती परत तेच म्हणाली. मला काही सुचेना, मी तिला परत तेच सांगितलं कारण गर्दी होती आणि मला पैसे काढायला वेळ लागत होता. तिचं डोकं सटकलं असावं बहुतेक. परत ती तेच म्हणाली पण एकदम चढ्या आवाजात. मला मग अचानक बुद्धी कुठून सुचली कोणास ठाऊक. मीही उत्तर दिले "मॅजेस्टिक" (मला इथे जायचं होतं). तेंव्हा कुठे तिचं समाधान झालेलं दिसलं. तिने मग लगेच तिकिट ठेवलं माझ्या हातात. नंतर "येल्ली" म्हणजे "कुठे" हे समजल्यावर मला माझंच खूप हसू आलं.
नानाप्रकारचे लोक बघायला मिळतात त्या १ तासाच्या प्रवासात. काळ्या दगडातल्या रेखीव मुर्त्यांना गजरा वगैरे लावून सजवलं तर दिसतील तशा कितीतरी बायका, सतत मारक्या म्हशीसारख्या पाहणाऱ्या काकू, या गर्दीत उभा राहाणं म्हणजे जगातली सगळ्यात दु:खद गोष्ट आहे असे भाव चेहऱ्यावर असणारे लोक आणि जसंकाही बस म्हणजे शाळाकॉलेजचा कट्टा आहे अशा समजुतीत आपल्याच धुंदीत गप्पा मारणारी लहान मुलं आणि युवा मंडळी. आज नवऱ्याला किती वाजता उठवलं आणि स्वयंपाकात काय बनवलं याही गप्पा कानावर पडतीलच.
"मुंदे होगी, मुंदे होगी" ( पुढे व्हा ) अशा घोषणा करत पुढे येणाऱ्या वाहकाचा डोळा चुकवून आहोत त्या जागी खांबाला धरून आरामात उभा रहाण्यात किंवा तिथेच बसलेल्या आणि लवकरच उतरणार आहे हे माहीत असलेल्या (ते माहीत करायला पण काय काय क्ल्रुप्त्या कराव्या लागतात माहीत आहे का. उदाहरणार्थ, त्या व्यक्तीच्या हातातल्या तिकिटावरचं भाडं पाहून अंदाज घेणं) व्यक्तीच्या उतरण्याची वाट पहात तिथेच अडून उभा रहाण्यात उगीचच एक आनंद मिळतो. ( असूरी आनंद कदाचित )
महीलांसाठी राखीव असं लिहीलेल्या जागेवर बसलेली टारगट पोरं जेंव्हा उठून आपल्याला जागा देतात ( स्त्रीदाक्षिण्य म्हणून नव्हे तर दंड लागू नये म्हणुन ) तेंव्हा उगीचच स्त्रीत्वाची जाणीव होऊन आनंद होतो. ( हाही तसा असूरी आनंदच )
ह्या आणि आणखी कितीतरी आठवणींनी भरलेल्या माझ्या कार्यालयाच्या वाऱ्यांऐवजी आजकाल एक वेगळचं वारं आहे माझ्या प्रवासांत. मी दुचाकी घेतली आहे नवीन...तिच्याबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन.

Tuesday, January 24, 2006

हॅरी पॉटर

हॅरी पॉटर ही एक अतिशय प्रसिद्ध कथामाला...मी अशातच पहिली ३ पुस्तकं वाचली...
प्रत्येक शाळकरी मुलाला आपण हॅरी पॉटर असावं असं वाटंलं नाही तर नवल.
मलाही माझे बालपण आठवले आणि अगदी पोटधरून हसू आले.
जादू, चमत्कार या गोष्टींबद्दल मला खूप चिकित्सा होती...आणि मल कितिदातरी असं वाटायचं की माझ्या आयुष्यातही जादू हॊऊ शकते...कित्येकदा माझ्या दिवास्वप्नांमध्ये मला असं वाटायचं की मी सकाळी झोपेतून उठून आरशात बघते तर काय मी गोरी झालेली, एकदम सुंदर, माझे केस एकदम सरळ,लांबसडक आणि काळेशार.
कितिदा तरी मला असं वाटयचं की मी असामान्य आहे...अगदी कॄष्णाचा कलियुगातील अवतार आहे वगैरे. :)
हॅरी पॉटर या काल्पनिक पात्राबद्दल अशा गोष्टी वाचताना खूप खूप मज्जा येते, त्याची शाळा, जिवाभावाचे मित्रं, सगळ्यांनी सहजपणे स्वीकारलेलं त्याचं असामान्यत्व (अगदी त्याने स्वत:नेसुद्धा) आणि ह्या सगळ्यांना गुंफून रचलेल्या अतिरंजित रहस्यकथा.
लेखिकेचे लेखनकौशल्य पाहून थक्क होऊन गेले मी..खूपच सुंदर!

Friday, January 20, 2006

का?

एका संध्याकाळी तिचा फोन वाजतो.
समोरची व्यक्ती: "हाय टींब टींब टींब"
ती: "हाय, कोण बोलतंय?"
समोरची व्यक्ती: "तू मला ओळखत नाहीस."
ती: "मग काय काम होतं तुमचं माझ्याकडे?"
समोरची व्यक्ती: "सहजच गप्पा मारायला फोन केला."
ती फोन कट करते.
थोड्यावेळाने परत फोन वाजतो.
समोरची व्यक्ती: "हाय टींब टींब टींब"
ती: "हाय, कोण बोलतंय?"
समोरची व्यक्ती: "मी बोलतोय"
ती: "आपलं नाव.."
समोरची व्यक्ती: "टींब टींब टींब"
ती फोन कट करते.
तिला ते नाव नीटसं ऐकू आलेलं नसतं. यापूर्वी कधीतरी तिला निनावी ई-मेल आलेली असतात.(पण तिने ते पाठावणाऱ्याला ओळखलेलं असतं.) तिला त्या व्यक्तिच्या आणि आत्ताच्या नावात साधर्म्य वाटतं. परत त्याचा फोन घायचा नाही म्हणून ती नम्बर स्टोअर करून ठेवते.."सायको" या नावाने.
त्याच रात्री परत तिला "एस एम एस" येतो: "तू टींब टींब टींब गावची आहेस ना?"
ती उत्तर देत नाही.

ती एका नवीन कंपनीमधे कामाला लागते.
तिथे तिचा टीममेट, क्युबिकलमेट तिला पहिला आठवडा खूप मदत करतो.
एक दिवस तिचा फोन नम्बर विचारतो..ती सांगते आणि त्यालाही त्याचा विचारते.
त्याचा नम्बर स्टोअर करताना मोबाईलवर "सायको" लिहून आलेलं बघून तिला खूप मोठा धक्का बसतो. मग तिला एक एक गोष्टी उलगडतात..तिचा इंटर्व्ह्यू फोनवर झालेला असतो आणि पहिल्याच दिवशी तिला त्याने सांगितलेला असतं की त्याने आणि अजुन काही लोकांनी तो घेतला होता..तिने फोनवर ऐकलेलं नावही हेच असतं...ती एक क्षण घाबरते...दुसऱ्या क्षणी तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते...तरीही ती काहीच करू शकत नाही मनातल्या विचारांच्या वादळाला शांत करण्याशिवाय...