स्वानंद

मराठीतून लिहीण्याचा स्वर्गीय आनंद घेताना...

Tuesday, January 24, 2006

हॅरी पॉटर

हॅरी पॉटर ही एक अतिशय प्रसिद्ध कथामाला...मी अशातच पहिली ३ पुस्तकं वाचली...
प्रत्येक शाळकरी मुलाला आपण हॅरी पॉटर असावं असं वाटंलं नाही तर नवल.
मलाही माझे बालपण आठवले आणि अगदी पोटधरून हसू आले.
जादू, चमत्कार या गोष्टींबद्दल मला खूप चिकित्सा होती...आणि मल कितिदातरी असं वाटायचं की माझ्या आयुष्यातही जादू हॊऊ शकते...कित्येकदा माझ्या दिवास्वप्नांमध्ये मला असं वाटायचं की मी सकाळी झोपेतून उठून आरशात बघते तर काय मी गोरी झालेली, एकदम सुंदर, माझे केस एकदम सरळ,लांबसडक आणि काळेशार.
कितिदा तरी मला असं वाटयचं की मी असामान्य आहे...अगदी कॄष्णाचा कलियुगातील अवतार आहे वगैरे. :)
हॅरी पॉटर या काल्पनिक पात्राबद्दल अशा गोष्टी वाचताना खूप खूप मज्जा येते, त्याची शाळा, जिवाभावाचे मित्रं, सगळ्यांनी सहजपणे स्वीकारलेलं त्याचं असामान्यत्व (अगदी त्याने स्वत:नेसुद्धा) आणि ह्या सगळ्यांना गुंफून रचलेल्या अतिरंजित रहस्यकथा.
लेखिकेचे लेखनकौशल्य पाहून थक्क होऊन गेले मी..खूपच सुंदर!

Friday, January 20, 2006

का?

एका संध्याकाळी तिचा फोन वाजतो.
समोरची व्यक्ती: "हाय टींब टींब टींब"
ती: "हाय, कोण बोलतंय?"
समोरची व्यक्ती: "तू मला ओळखत नाहीस."
ती: "मग काय काम होतं तुमचं माझ्याकडे?"
समोरची व्यक्ती: "सहजच गप्पा मारायला फोन केला."
ती फोन कट करते.
थोड्यावेळाने परत फोन वाजतो.
समोरची व्यक्ती: "हाय टींब टींब टींब"
ती: "हाय, कोण बोलतंय?"
समोरची व्यक्ती: "मी बोलतोय"
ती: "आपलं नाव.."
समोरची व्यक्ती: "टींब टींब टींब"
ती फोन कट करते.
तिला ते नाव नीटसं ऐकू आलेलं नसतं. यापूर्वी कधीतरी तिला निनावी ई-मेल आलेली असतात.(पण तिने ते पाठावणाऱ्याला ओळखलेलं असतं.) तिला त्या व्यक्तिच्या आणि आत्ताच्या नावात साधर्म्य वाटतं. परत त्याचा फोन घायचा नाही म्हणून ती नम्बर स्टोअर करून ठेवते.."सायको" या नावाने.
त्याच रात्री परत तिला "एस एम एस" येतो: "तू टींब टींब टींब गावची आहेस ना?"
ती उत्तर देत नाही.

ती एका नवीन कंपनीमधे कामाला लागते.
तिथे तिचा टीममेट, क्युबिकलमेट तिला पहिला आठवडा खूप मदत करतो.
एक दिवस तिचा फोन नम्बर विचारतो..ती सांगते आणि त्यालाही त्याचा विचारते.
त्याचा नम्बर स्टोअर करताना मोबाईलवर "सायको" लिहून आलेलं बघून तिला खूप मोठा धक्का बसतो. मग तिला एक एक गोष्टी उलगडतात..तिचा इंटर्व्ह्यू फोनवर झालेला असतो आणि पहिल्याच दिवशी तिला त्याने सांगितलेला असतं की त्याने आणि अजुन काही लोकांनी तो घेतला होता..तिने फोनवर ऐकलेलं नावही हेच असतं...ती एक क्षण घाबरते...दुसऱ्या क्षणी तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते...तरीही ती काहीच करू शकत नाही मनातल्या विचारांच्या वादळाला शांत करण्याशिवाय...

Thursday, January 19, 2006

तुला माझे हात आवडतात,
मला तुझं हात हातात घेणं आवडतं,
आपल्यालाच कळत असेल का हे
की हातांनाही ते जाणवतं?

एक अल्पसा प्रयत्न

काय लिहू काही सुचत नाही आहे. पण लिहायची उर्मी चढली आहे.
खूपसे विषय आहेत जे खूप लोकांशी बोलावे वाटतात..डायरी लिहिणं तर मी जवळ्पास सोडूनच दिलं आहे. ती कधीकाळी माझी खूप जवळची मैत्रीण होती. माझं आयुष्य, आयुष्यातली स्वप्नं आणि आयुष्यातली नाती इतकंच काही त्यात सापडेल. बालपणाच्या शाळेतल्या गंमती-जंमती, मैत्रिणिंशी भांडणं आणि मग हळूहळू परिपक्वं होत गेलेले विचार आणि त्याबरोबरच परिपक्वं होत गेलेली नाती, तरुणईतली वेगवेगळ्या विषयांवर मांडलेली मतं ( अशा अविर्भावात की जशी काही ती ब्रम्हवचनंच :) ) हे सगळं काही आजही वाचताना खूप मज्जा येते. पण हे सगळं जरा जास्तच "पर्सनल" आहे..आता जरा म्हटलं ब्लॉग काय असतं ते लिहुयात. खरं म्हटलं तर ब्लॉग्ज हा प्रकार मला कधी विशेष रुचला नाही, म्हणजे तसं वाचायला आवडला पण... कालच मी एक मराठी ब्लॉग वाचला ( http://www.anand-kulkarni.blogspot.com ) आणि मग मला एकदम लिहायची खुमखुमी आली.. ;)
एक अल्पसा प्रयत्न...